नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – धनगर समाजाच्या
आरक्षणाबाबतचा लढा अंतिम टप्प्यात असून कोकणातील महाडच्या चवदार तळयापासून आज
२७ फेब्रुवारीला त्याची सुरुवात होणार आहे.
धनगर आरक्षणाच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे, धनगर आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याचे प्रमुख उत्तमराव जानकर, गोपीचंद पडळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई,आ. प्रकाश शेंडगे,खा. विकास महात्मे, आ. नारायण पाटील आदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. धनगर आरक्षणाबाबत टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा (टिस) अहवाल राज्य सरकारला मिळाला असून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी धनगर आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले. केंद्र सरकारकडे शिफारस करून धनगर समाजाचा विश्वासघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. त्यामुळे या विरोधात धनगर आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याचे आयोजन केले आहे. नेते उत्तमराव जानकर, गोपीचंद पडळकर २७ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या चवदार तळे महाडहून विधानभवनाकडे पदयात्रेने कुच करणार आहेत. या पदयात्रेत नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मौर्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूरातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव जाणार
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी निघणाऱ्या महाड ते मुंबई विधानभवनवरील पदयात्रा मोर्चेसाठी सोलापूर जिल्ह्यातून मेंढरं, घोडे या जनावरांसह हजारोंच्या संख्येने समाज बांधव जाणार असल्याची बाळासाहेब बंडगर- पाटील यांनी दिली. या पदयात्रा मोर्चातून शासनाचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. पदयात्रेच्या नियोजनासाठी बंडगर- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गणेश गावडे, अण्णासाहेब देशमुख, सागर पांढरे, बिरूदेव देवकते (मोहोळ), शामराव पाटील, कालिदास गावडे, माऊली हळणूर (पंढरपूर), प्रा. सुभाष मस्के, अण्णासाहेब यलगोंडे, ज्योत्यप्पा पुजारी, सचिन चौगुले, दगडू व्हनमाने, गणेश खताव, राधाकृष्ण पाटील, अण्णप्पा सतूबर, शरणू हांडे, अनिल घोडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महाडपासून निघर्णाया या मोर्चात एक लाख समाज बांधव सहभागी होणार आहेत. गोपीचंद पडळकर व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.