निलंगा : बहुजननामा ऑनलाईन – माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधुन खरोसा येथील ऐतिहासिक लेणी परिसरात येत्या 7 व 8 फेब्रूवारी रोजी दोन दिवसीय धम्मपद महोत्सवाचे आय़ोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजक भंते सुमेधजी नागसेन यांनी दिली.
निलंगा तालुक्यातील खरोसा लेणी परिसरात असलेल्या श्रावस्ती बुद्ध विहार येथे भव्य – दिव्य सभामंडपामध्ये हा महोत्सव पार पडणार असून या बुद्ध विहार व विपश्यना केंद्रासाठी एकूण 5 एकर जमिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती भंते सुमेधजी नागसेन यांनी दिली. या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रीलंकेतील धम्माचे गाढे अभ्यासक भिक्खु शिवली महाथेरो उपस्थित राहणार आहेत. तर अखिल भारतीय भिक्खु संघाचे अध्यक्ष भिक्खु सदानंदजी महाथेरो यांच्यासह पूर्णा येथील भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो , भिक्खु खेमधम्मो महाथेरो(मुळावा), भिक्खु महाविरो (काळेगाव), भिक्खु ज्ञानरक्षित (औरंगाबाद), भिक्खु धम्मशील(हिंगोली), भिक्खु पय्यानंद(लातुर), भिक्खु पय्याबोधी(नांदेड़), भिक्खु नागसेन बोधी (उदगीर) यांच्यासह देशाभरातील अनेक भिक्खु उपस्थित राहणार आहेत. यावेळी थायलंड येथील 200 किलो वजनाच्या 6 फुट उंची असलेल्या बुद्धमुर्तींचे श्रावस्थी बुद्ध विहाराच्या वतीने दान देण्यात येणार आहेत.
तसेच या महोत्सवास दै वृत्तरत्न सम्राटचे संपादक आयु बबन कांबळे साहेब यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. या महोत्सवास ऊपासकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असेही आवाहन भंते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे.