बहुजननामा ऑनलाईन – बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात घडली आहे. नराधम बापाने मुलीवर शारिरीक अत्याचार केल्याने मुलगी गरोदर राहिली. यातूनच तिने एका बाळाला देखील जन्म दिला आहे. या धक्कादायक घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा हादरला असून घाटकोपरमधील पंतनगर पोलिसांनी बापाला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावातून अटक केली आहे.
नराधम बाप कुटुंबासह मुंबईतील घाटकोपरमध्ये राहतो. तो एका मॉलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करत होता. एके दिवशी पहाटे पाचच्या सुमारास तो हॉलमध्ये झोपलेल्या मुलीशी लगट करू लागला. यावेळी मुलीने विरोध देखील केला. पण, बापाने जबरदस्तीने मुलीवर अत्याचार केले. घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास मी मरून जाईन, अशी धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने प्रकार कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर देखील बापाकडून मुलीवर अत्याचार सुरू होते.
लॉकडाऊनच्या काळात मुलीने सार्या प्रकारातून सुटका मिळवण्यासाठी गाव गाठले होते. मात्र त्यानंतर देखील काही निमित्त बाप गावी आला. याकाळात देखील त्याने मुलीवर अत्याचार सुरूच ठेवले. यातून मुलगी गर्भवती देखील राहिली. गर्भवती असल्याचे लक्षात येताच मुलीने थेट मुंबई गाठली. पोटात दुखु लागल्याने तिने बहिणीला माहिती सांगितली. डॉक्टरांनी देखील मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. यानंतर बापाविरोधात मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.