इंदूर : बहुजननामा ऑनलाईन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. रुग्णांचे नातेवाईक रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अधिक पैसे मोजत आहेत. अशातच बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवणाऱ्या फार्मा कंपनीच्या मालकाला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 400 बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त केले आहेत.
विनय त्रिवेदी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो एका फार्मा कंपनीचा मालक आहे.
प्राप्त माहितीनुसार, मध्यप्रदेशात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भोपाळ-इंदूरमध्ये इंजेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार इंदूरमध्ये इंजेक्शन मागवून रुग्णांना उपलब्ध करून देत आहे. असे असतानाच आरोपी बनावट इंजेक्शन पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार इंदूरच्या क्राईम ब्रॅच पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 400 बनावट इंजेक्शन जप्त केले आहेत. आरोपी एका फार्मा कंपनीचा मालक आहे. इंदूरचे आयजी हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितले की, पोलिसांनी त्रिवेदीला खंडवा रोड येथून अटक केली आहे. त्याच्याकडे सापडलेल्या इंजेक्शनची कागदपत्रे तो सादर करू शकला नाही. पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. पोलिसांनी त्याच्याकडील 25 बॉक्स जप्त केले आहेत. इंदूरमध्ये त्याने असे किती इंजेक्शन पुरवले आहेत, याची माहिती घेतली जात असल्याचे ते म्हणाले.