औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – बनावट चलनी नोटा (Fake Currency) छापून (print) बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी त्या वापरल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.8) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टीव्ही सेंटर भागातील संजय गांधी मार्केट येथे सापळा रचून करण्यात आली.
संदीप श्रीमंत आरगडे (वय-32 रा. नाथनगर, वैतागवाडी, वीटाखेडा परिसर), निखिल आबासाहेब संबेराव (वय-29 रा. पहाडसिंगपुरा, गुरुकृपा शॉपमागे) अशी संशयितांची नावे आहेत. दुचाकीवरुन दोघे बनावट नोटा घेऊन टीव्ही सेंटर भागात आल्याची तसेच वस्तू खरेदीसाठी या नोटा वापरल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सिडको पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
पोलिसांनी या दोघांकडून 1 लाख 50 हजार रुपयांच्या चलनी नोटासारख्या दिसणाऱ्या शंभर, दोनशे आणि दोन हजार अशा प्रकारच्या क्रमांकाच्या अनेक बनावट नोटा जप्त केल्या. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी धारुर येथील आकाश संपती माने (रा. जाधव गल्ली, धारुर) या साथीदाराची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने धारुर येथे जाऊन त्याचा शोध घेतला असता तो शेतात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गावातील त्याच्या ग्राहक सेवा केंद्रावरुन (Maha E Seva) बनावट नोटा छापल्याची कबुली दिली. पोलिसांनी नकली नोटा छापण्याचे साहित्य, प्रिंटर, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, शंभर, दोनशे रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या.
पोलिसांनी आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सांगितले की, वीस हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात एक लाखाच्या बनावट नोटा विक्री करत असल्याची माहिती त्यांनी दिली. जप्त केलेल्या नोटांवर एकसारखेच क्रमांक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत एकूण पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, बाळासाहेब आहेर, दिनेश बन, सुबाष शेवाळे, नरसिंग पवार, विजयानंद गवळी, प्रकाश डोंगरे, विशाल सोनवणे, सुरेश भिसे, गणेश नागरे, स्वप्नील रत्नपारखी, लालखाँ पठाण यांनी केली. पोलिसांनी बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली आहे.