पुणे : बहुजननामा ऑनलाईन –पत्ता बदलून बोगस आधारकार्ड तयार करून आणि अन्य बनावट कागदपत्रे तयार करून दलित, वंचित मुलांच्या राखीव जागांच्या आरक्षणाचा फायदा घेत शाळेत इतर मुलांना आरटीईचे प्रवेश मिळवून देणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, दोन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कलर प्रिंटर, बनावट शिक्के तसेच अन्य बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.
दीपक विठ्ठल गरुड (वय ३६, रा़ महादेवनगर, हडपसर), सचिन बहिरट (वय ३६, रा़ माळवाडी, हडपसर), सुधीर अभिमन्यू काकडे (वय ३५, रा़ माळवाडी, हडपसर), ऋषिकेश भानुदास इमाले (वय २८, रा़ टाकवे खुर्द ता़ मावळ) आणि अनिकेत सुरेश शिंदे (वय ३२, रा़ शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
५० हजार ते १ लाख रुपये उकळायची टोळी
ही टोळी शाळेत प्रवेशासाठी येणाऱ्या लोकांना हेरायची. त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५० हजार ते १ लाख रुपये घेत. त्यांच्या व मुलाच्या नावाच्या आधार कार्डवरील पत्ता बदलून बनावट कार्ड तयार करीत. त्यानंतर त्यांचे उत्पन्न १ लाख रुपयांच्या खाली असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारत आणि ती आर टीईच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सादर करीत असत.
लॉजवरून सुरु होते काम
हडपसर येथील एका लॉजवर ही टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तेथे छापा घालून त्यांना पकडले. त्यांच्याकडून बोगस कागदपत्रे तराय करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
या टोळीमार्फत प्रवेश मिळविलेल्या मुलांचे प्रवेश अडचणीत
या टोळीमार्फत बनावट कागदपत्राद्वारे ज्यांनी प्रवेश मिळविले असतील. त्यांचे प्रवेश अडचणीत येणार आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास ५० मुलांना प्रवेश मिळवून दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.