नोएडा : आठ वर्षांपासून आयएएस, आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या दोघा भामट्यांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. यांनी एका व्यक्तींसह काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आपण अधिकारी असल्याचे भासवून धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे समोर आले आहे.
गौरव मिश्रा आणि आशुतोष राठी अशी या दोन आरोपीची नावे असून नोएडा पोलिसांनी त्यांना मेट्रो स्टेशन वरून ताब्यात घेतले. पोलिसांकडे खंडणी मागितल्यामुळे त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगे हात पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्या कडे पोलिसांची खाकी वर्दी, आयएएस आणि आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट बॅचेस , बनावट ओळखपत्र असल्याचे आढळून आले.
या दोघांनी राजकीय नेत्याचे नाव घेऊन माझ्याकडे खंडणी मागितली ,असा आरोप तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांनकडे केला. त्याचप्रमाणे काही पोलीस कर्मचार्यांना देखील बदली ची धमकी देऊन पैसे उकळण्याचा उद्योग सुरु केला होता. अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी दिली.
दिल्लीमध्ये अशा घटनांना उधाण आले आहे. जुलैमध्ये घरच्यांना आणि होणाऱ्या बायकोला पोलीस अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या आशिष चौधरी या तरुणाला अटक केली होती. त्याचप्रमाणे जूनमध्ये आपण आयपीएस अधिकारी असून आणि आपण जनसंपर्क अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या अखिलेश यादव आणि आदित्य दीक्षित या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली होती.