कल्याण : बहुजननामा ऑनलाईन – एका फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याने महिलेशी उद्धट वर्तन करीत मनसे प्रमुख राज ठाकरे आले तरी तुम्हाला हप्ता भरावाच लागेल अशी भाषा वापरली होती. हा प्रकार समजताच संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीचे कार्यालय गाठत संबधित कर्मचाराला चांगलेच बदडून काढले अन् त्याला माफी मागण्यास भाग पाडले. कल्याण पूर्व भागातील आर. एल. बी. फायनान्स कंपनीत मंगळवारी (दि. 23) हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकून व्हायरल केला आहे.
कल्याण काटेमानीवली परिसरात आर. एल. बी. फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून एका महिलने काही लोन घेतले होते. तिच्या लोनचे हप्ते शिल्लक असल्याने कंपनीच्या कार्यालयातील कर्मचारी अनिल भोगे याच्याशी तिने संपर्क साधला. त्यावेळी भोगे याने महिलेशी चुकीच्या भाषेत संवाद साधला. तसेच उद्धट वर्तन केले. तसेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे जरी आले तरी तुम्हाला लोनचा हप्ता द्यावाच लागेल, अशी भाषा वापरली होती. हा प्रकार मनसेचे पदाधिकारी उदय वाघमारे यांना कळला. त्यानंतर त्यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात धाव घेत ठाकरे यांच्याविरोधात विधान करणाऱ्या कर्मचा-याला चांगलाचा चोप देत उठा बशा काढायला लावून माफी मागायला लावले.