नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कागदपत्रात घोळ असल्याचे सांगून 50 हजार रुपयाची लाच स्विकारताना कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) जम्मू विभागीय कार्यालयातील उपसंचालकाला सीबीआयने रंगेहाथ पकडले आहे. सीबीआयने उपसंचालकाला अटक केली आहे. तक्रारदाराला लावण्यात आलेला 23 लाख रुपयांचा दंड कमी करण्याच्या बदल्यात उपसंचालकाने लाच घेतली.
खासगी सुरक्षा कंपनीचा मालक व कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरुन ही करवाई करण्यात आली आहे. कागदपत्रात घोळ असल्याच्या आरोपावरुन ईएसआयसीने त्यांना नोटीस पाठवली होती.
या संदर्भात माहिती देताना सीबीआयचे प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी सांगितले की, कारवाईबाबद माहिती मिळताच तक्रारदार व कंपनीचा मालक हे दोघेही उपसंचालकांना भेटण्यासाठी ईएसआयसी कार्यालयात गेले. याठिकाणी उपसंचालकाने कागदपत्रात घोळ असल्याचे सांगितले तसेच 23 लाख रुपयांचा दंड लावणार असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारानंतर सीबीआयने सापळा रचून आरोपीला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.
रोख रक्कम कागदपत्रे जप्त
या कारवाईनंतर आरोपीच्या चंदीगड, मोहाली व जम्मूतील परिसरांची झडती घेण्यात आली. यामध्ये 7 लाख रुपयाची रोख रक्कम आणि मालमत्तांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.