नवी दिल्ली : वृत्तसंथा – मोदी सरकार लवकरच नोकरदारांसाठी खुशखबर घेऊन येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)नं आपल्या सदस्यांसाठी जीवन विमा संरक्षणाची रक्कम वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्याअंतर्गत विमा संरक्षण रक्कम ६ लाख रुपयांवरून वाढवून १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे किमान संरक्षण रक्कम २.५ लाख रुपयांवरून वाढवून ४ लाख रुपये होण्याची शक्यता आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. EPFO खातेदारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि कर्मचारी पेन्शन योजने (EPS)शिवाय जीवन विमा संरक्षणाचा आणखी एक मोठा फायदा मिळणार आहे.
दरम्यान , EPFमध्ये आपला १२ टक्के पैसे जमा होतात. त्याप्रमाणे यातील काही रक्कम EPF आणि पेन्शनमध्येही जात असते. EDLI योजनेंतर्गत कंपनीकडूनही ०.५० टक्के योगदान दिलं जातं. EDLI योजनेंतर्गत ६ लाख रुपयांपर्यंतचा संरक्षण विमा खातेदाराच्या वारसाला मिळतो. खातेदाराचा आजारपण किंवा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास खातेदाराचा वारस त्यातील रक्कम काढू शकतो. विशेष म्हणजे पीएफ खात्याशी ते लिंक असल्याने खातेदाराला कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.
EDLI योजनेंतर्गत खात्यात एक ठरावीक रक्कम शेवटच्या पगारापर्यंत जमा होत असते. EDLIमध्ये पगाराची मर्यादा १५ हजार रुपये असते. तसेच आपल्याला ईपीएफओकडून १.५० लाख रुपये बोनस दिला जातो.