नवी दिल्ली : नोकरी करणार्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या मते पीएफ (ईपीएफ) वर २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज दिले जाईल. त्यामुळे ६ कोटी खातेदारांना याचा थेट लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच व्याज रक्कम नोकरी करणाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा केली जाईल. दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून पीएफ खात्याच्या व्याजदरावर यावर सहमती होऊ शकली नव्हती. यापूर्वी २०१७-१८ या आर्थिक वर्षात व्याजदर ८.५५ टक्के होते. म्हणजे व्याजदरात ०. १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ईपीएफओ लवकरच व्याज दराची वाढलेली रक्कम खातेधारकांच्या खात्यावर ट्रान्सफर करणार आहे. सरकारच्या इतर छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा ८.६५ टक्के दर जास्त आहे. बाजार दरावरील योजनांच्या परताव्यासाठी लहान बचत ही बेंचमार्क असते. ईपीएफओमध्ये ६ कोटी पेक्षा जास्त सक्रिय सदस्य आहेत. ही संस्था ११ लाख कोटींपेक्षा जास्त निवृत्तीची बचत करते.
ईपीएफ व्याज दरांसंदर्भात :
* आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ईपीएफवरील व्याज दर ८.५५ टक्के होता.
* त्याच वेळी, ईपीएफओने २०१६-१७ मध्ये ईपीएफवरील व्याज दर कमी करून ८.६५ टक्के केले. तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात व्याजदर ८.८० टक्के होते.
नोकरदऱ्यांच्या पगारामधून पीएफ म्हणून एक भाग वजा केला जातो. ही रक्कम तुमच्या पीएफ (भविष्य निर्वाह निधी) खात्यात जमा केली जाते. याला गुंतवणूकीचा एक प्रकार म्हणतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) कर्मचार्यांना निवृत्तीनंतर आर्थिक लाभ देणारी योजना आहे, जी कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी संस्थेमार्फत चालविली जाते. सरकार त्याचे व्याज दर ठरवते.
दरमहा कंपनी सर्व कर्मचार्यांच्या मूलभूत पगारामधून १२ टक्के पैसे वजा करून पीएफ खात्यात ठेवते. कर्मचार्यांसह कंपनीकडून मिळणाऱ्या १२ टक्के रक्कमही त्या कर्मचार्याच्या पीएफ खात्यात ठेवली जाते.