नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ऑर्गनायझेशन ईपीएफओने नोकरी करणाऱ्यांना वेबसाइट, टेली कॉल्स, एसएमएस, ई-मेल, सोशल मीडियाच्या बनावट ऑफर्सपासून सावध केले आहे. ईपीएफओने आपल्या वापरकर्त्यांना सांगितले की, जर तुम्हाला काम करण्यासाठी कोणी बँकेत पैसे जमा करायला सांगितले तर सावधान व्हा. कारण असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. ईपीएफओने आपल्या ट्विटरद्वारे बनावट बातम्यांविषयी माहिती दिली. बनावट ऑफर आपल्याकडून क्लेम सेटलमेंट, अॅडव्हान्स पेन्शन किंवा इतर कोणत्याही सेवेसाठी बँकेत पैसे जमा करायला सांगितले तर सावधान व्हा, असे ईपीएफओने म्हटले आहे.
ईपीएफओने आपल्या ग्राहकांना आधार क्रमांक, पॅन, बँक तपशील संबंधित कोणतीही वैयक्तिक माहिती फोनवर सामायिक करू नये, असे आवाहन केले आहे. ईपीएफओ पीएफ ग्राहकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबरही सामायिक करण्यास मनाई केली आहे. यासंदर्भात ईपीएफओने आपल्या संकेत स्थळावर ‘आम्ही फोनवर पॅन, आधार क्रमांक किंवा बँके संबंधित कोणतीही माहिती कधीच विचारत नाही. तुम्ही फेक कॉलला प्रतिसाद देत आपली वैयक्तिक माहिती देऊ नका,’ असे लिहिले होते.
जर आपण फसवणूकीचे शिकार असाल किंवा आपल्याला बनावट संदेशांबद्दल तक्रार करायची असेल तर आपण कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन तक्रार दाखल करू शकता. तुमच्याकडे थेट ईपीएफओशी संपर्क साधण्याचा पर्याय असून 1800118005 या टोल फ्री क्रमांक आठवड्याच्या प्रत्येक दिवशी २४ तास खुला असतो. ईपीएफओने ग्राहकांना त्यांचे पीएफ रक्कम जाणून घेण्यासाठी माहिती दिली आहे. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर 011-22901406 वर मिस कॉल देऊन आपण आपली पीएफ रकमेबद्दल माहिती करून घेऊ शकता.