‘मराठा समाजाचा सरसकट OBC मध्ये समावेश करावा, अन्यथा…’, संभाजी ब्रिगेडनं दिला इशारा

January 10, 2021

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून पुन्हा एकदा मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अन्यथा राज्यभर लढा उभारला जाईल, असा इशारा संभाजी बिग्रेडच्यावतीने (sambhaji brigade) देण्यात आला आहे.

न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड आयोगाच्या शिफारशी स्वीकारून त्याआधारे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा व आत्ता ओबीसीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे वर्ग आहेत. ( NT A B C D, VJ, SBC ) तशीच एक सबकॅटेगरी तयार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि त्यानंतर ओबीसीची टक्केवारी वाढवण्यासाठी नचिपन समितीचा अहवाल स्वीकारावा. ही प्रमुख मागणी संभाजी ब्रिगेड गेल्या 30 वर्षापासून करत आहे. या मार्गाने गेल्यास मराठ्यांच आरक्षण टिकणार आहे. परंतु राज्य सरकार वेगवेगळे असंवैधानिक पर्याय देऊन समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.

याबाबात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे म्हणाले की, मराठा सेवा संघ गेल्या 30 वर्षापासून मराठा आरक्षणाची भूमिका घेऊन महाराष्ट्र मध्ये काम करत आहेत. कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाने जगाला आदर्श ठरतील असे 58 मोर्चे काढले. मराठा समाजाच्या अनेक न्यायिक मागण्या या आंदोलनातून पुढे आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाची दीर्घकालीन सुरु असलेली आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.

संभाजी ब्रिगेडने केलेली मागणी न्यायिक, संवैधानिक असून येथून पुढे ओबीसी समावेशासाठी लढा उभा केला जाणार आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण, एसईबीसी आरक्षण व ओबीसी आरक्षण यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तरीसुद्धा राज्य सरकार वेगवेगळे पत्र काढून ईडब्ल्यूएस मराठा समाजाला लागू होणार नाही अशा पद्धतीने दिशाभूल करीत आहे. ईडब्ल्यूएस आरक्षण हे ज्याला कुठलेल आरक्षण नसते. त्याला ते आपोआप लागू होत असते, असे असतानासुध्दा सर्ऱास समाजाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम सरकार करीत आहे. विविध नोकरभरती आणि परीक्षेची घोषणा करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे कामही राज्य सरकार करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय कुठलीही भरती किंवा कुठलीही परीक्षा सरकारने घेऊ नये. या मागण्यांसाठी संभाजी ब्रिग्रेड महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढवेल आणि राज्यभर लढा उभारला जाईल असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने दिला आहे.