नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)पेन्शनशी संबंधित एक प्रमुख नियम बदलण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनची वयोमर्यादा ५८ वर्षांवरून ६० वर्षे केली जाऊ शकते. वास्तविक सध्याच्या काळात, वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यावरही, आपल्या सेवेचा कार्यकाळ १० वर्षांचा झाला असेल तर आपण पेन्शनसाठी पात्र ठरता आणि ५८ व्या वर्षी तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून पैसे मिळतात. परंतु EPFO आता हीच वयोमर्यादा ५८ वर्षांवरून ६० वर्षांपर्यंत वाढवणार आहे.
दरम्यान, EPF कायदा १९५२ बदल करण्याची तयारी करत आहे. त्यामागील कारण म्हणजे जगभरातील निश्चित वयोमर्यादा . जगातील बहुतेक पेन्शन फंडांमध्ये पेन्शनचे वय ६५ वर्षे निश्चित केले गेले आहे, म्हणूनच ते बदलण्याची तयारी सुरु आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या ईपीएफओ सेंट्रल बोर्ड ट्रस्टच्या बैठकीत याचा विचार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पेन्शन फंडाला ३० हजार कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे. तसेच नोकरदार लोकांच्या सेवानिवृत्तीचे वयही २ वर्षांनी वाढू शकते.मंडळाने मान्यता दिल्यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडे पाठविला जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.
दरम्यान नोकरी केलेल्या लोकांच्या पगारामधून वेतन दोन खात्यात जाते. पहिला भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPF आणि दुसरा पेन्शन फंड म्हणजे EPS . कर्मचार्यांच्या मूलभूत पगाराच्या १२ टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा होतात. याखेरीज ईपीएफचा ३.६७ टक्के हिस्सा कंपनीकडून जमा केला जातो आणि उर्वरित ८. ३३ टक्के कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेत (EPS) जमा होतात. ईपीएफसाठी जास्तीत जास्त वेतन सध्या दरमहा १५ हजार रुपये आहे. त्यामुळे ईपीएसमध्ये जास्तीत जास्त योगदान दरमहा १२५० रुपये आहे. १९९६ मध्ये ईपीएस कायद्यातील दुरुस्तीनंतर कर्मचार्यांना निवृत्तीवेतनाचे योगदान ८.३३ टक्के वेतनात (बेसिक आणि डीए) वाढविण्याचा पर्याय मिळाला. ईपीएसमधील योगदानास वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यास नियोक्ताच्या संमती पत्रासह EPFO कडे अर्ज करावा लागेल.
तसेच एखादा कर्मचारी त्याच्या पीएफ खात्याची रक्कम ठराविक वेळानंतर काढू शकतो, परंतु पेन्शनची रक्कम काढून घेण्याचे नियम कठोर असतात, कारण ते वेगवेगळ्या परिस्थितीत निश्चित केले जातात. जर नोकरी ६ महिन्यांपेक्षा जास्त असेल आणि ९ वर्षे ६ महिन्यांपेक्षा कमी असतील तर फॉर्म १९ आणि १० सी सादर करुन पेन्शनची रक्कम देखील पीएफसह काढता येऊ शकते. परंतु, त्यासाठी तुम्हाला पीएफ कार्यालयात मॅन्युअल मार्गाने अर्ज करावा लागेल. दरम्यान पेन्शन निधी काढण्याची सुविधा अद्याप ऑनलाइन प्रक्रियेत सुरू केलेली नाही. फॉर्म भरल्यानंतर त्यांना ते नियोक्ता अर्थात ईपीएफओच्या कार्यालयात सादर करावे लागतील.
Visit : bahujannama.com