बहुजननामा ऑनलाईन टीम – नोकरदारांना मिळणाऱ्या पीएफ रक्कमेसाठी नोकरदारांना कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागायचे. पण आता या हेलपाट्यांपासून कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे. कारण आता नोकरदारांना पीएफ खात्यातून ऑनलाइन पद्धतीने अॅडव्हान्स रक्कम ऑनलाइन काढण्याची सोय कार्यालयाने उपलध केली आहे. पुणे आणि आकुर्डी कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
पीएफ खात्यासोबत आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि बँक खाते क्रमांक खातेधारकांना पीएफ कार्यालयातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम दाखल करताना हे कागद पत्र जोडणे बंधनकारक आहे. त्यानुसार, खातेधारकाचे केवायसी पूर्ण झाल्यावर पीएफ खात्यातून त्या व्यक्तीस अॅडव्हान्स रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम दाखल करता येणार आहे. असे पीएफच्या पुणे आणि आकुर्डी कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
नागरिकांना नेहमीच मुलांचे उच्च शिक्षण, लग्नकार्य, घर खरेदी किंवा घराची दुरुस्ती, आजार अशा अनेक कारणांसाठी पैशांची गरज भासत असते. त्यासाठी पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेतून आगाऊ रक्कम काढण्याची सोय आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. याआधी अॅडव्हान्स क्लेमची प्रक्रिया ही किचकट होती. आगाऊ रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यावर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागत होती. यासाठी पीएफ कार्यालयात जावे लागत असे. मग अर्जाची पडताळणी झाल्यानंतर अॅडव्हान्स क्लेम मान्य होत असे. यानंतर संबंधित खातेधारकाच्या खात्यात आगाऊ रक्कम जमा केली जात असे. या प्रक्रियेमुळे खातेदाराची गैरसोय होत असल्याने आता ऑनलाईन अॅडव्हान्स क्लेम स्वकारण्याचा निर्णय पीएफ कर्यलायाने घेतला आहे.
खातेदार घरबसल्या उमंग अप्लिकेशनचा वापर करून त्यांच्या खात्यातून अॅडव्हान्स रक्कम काढण्यासाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर आठवडाभराच्या आत त्याच्या खात्यात रक्कम जमा केली जाते अशी माहिती पीएफ कार्यालयातील आयुक्त अतुल कोतकर यांनी दिली.