पुणे : बहुजननामा ऑनलाईन – एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार शर्जील उस्मानी आज पुन्हा पुणे पोलिसांसमोर हजर झाला. स्वारगेट पोलीस ठाण्यात तो हजर झाल्यानंतर त्याचा जबाब घेण्यात आला आहे. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. सकाळी साडे आकरा ते दुपारी साडे तीन तो पोलीस ठाण्यात होता, असे उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.
याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत गावडे यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार गुन्हा दाखल केला गेला आहे.
गेल्या महिन्यात (दि. 30 जानेवारी) पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एल्गार परिषद पार पडली होती. याठिकाणी शर्जील उस्मानी याच्यासह काहीजणांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शर्जील उस्मानी हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांचे पथक दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेत होते. पण तो सापडला नव्हता. दरम्यान त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने त्यावर उस्मानी याच्यावर कडक कारवाई नको, असे म्हणत त्याला पुणे पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उस्मानी हा आज (गुरुवारी) स्वारगेट पोलिसांकडे हजर झाला. पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने त्याची चौकशी करून जबाब नोंदवला आहे. 22 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे.