मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- पंजाबमधील पटियाळामध्ये एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी आपल्या मुलीने केलेल्या प्रेमविवाहामुळे चिडलेल्या वडिलांनी तिच्या सासरच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत प्रदर्शन केले. त्याचबरोबर मुलाच्या वडिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या व्यक्तीच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अन्य आरोपी फरार आहेत. शिंगारा सिंग असे या आरोपी पित्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष सिंग यांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितले की, ते पेंटर काम करत असून त्यांनी चार वर्षांपूर्वी शिंगारा सिंग यांच्या मुलीबरोबर प्रेम विवाह केला होता. त्यानंतर मे २०१९ मध्ये त्यांच्यावर शिंगारा सिंग आणि त्यांच्या परिवाराने घरात घुसून हल्ला केला होता. यामध्ये ते स्वतः त्यांची आई आणि बहीण जखमी झाले होते. मात्र त्यानंतर देखील शिंगारा सिंग यांनी त्यांना धमकावण्याचे तसेच शिव्या देण्याचे सुरूच ठेवले होते.
त्यानंतर अनेकवेळा शिंगारा सिंग याने त्यांच्या घरासमोर येऊन अर्धनग्न अवस्थेत आंदोलन देखील केले. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यानंतर देखील त्याच्या हरकती बंद न झाल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.