Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर: Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | आज आषाढी वारीचा सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूर नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. वारकरी, शेतकरी, कष्टकरी सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी साकडे घातले. (CM Eknath Shinde In Pandharpur)
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील १६ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ३० टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहेत. मंदिर समितीने केलेल्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार केला. वारकऱ्यांसाठीच्या योजना, महामंडळाबाबत माहिती दिली. तसेच पुढील वर्षी तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून येणार का, या प्रश्नावर पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून यायचे की नाही हे विठुरायावर आणि जनता जनार्दनावर अवलंबून आहे, असे शिंदे म्हणाले.
पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी. पर्यावरण राहिले तर आपण राहू. त्यामुळे आपण पर्यावरण वाचवले पाहिजे. मागील १५ वर्षांपासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल विभागाचे अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले.
तसेच एक वारकरी, एक झाड ही संकल्पना आहे. पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करतोय. २० लाख बांबूची रोपे लावणार आहोत. बांबू किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात आले. आपण फक्त कोणाला बांबू… तो पण लावावा लागतो. तो वेगवेगळ्या पद्धतीने लावावा लागतो. माणसाला पण शेवटी बांबूच लागतो, अशा शब्दांत शिंदेंनी फटकेबाजी केली.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन साठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर १०३ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले आहेत. भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचे सहज सुलभ दर्शन घेता येणार आहे.
Comments are closed.