बहुजननामा ऑनलाइन टीम – भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कधी करणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगात आल्या होत्या. मुक्ताईनगरला त्याची तयारीपण सुरु झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ चिन्ह हटवलं आहे. नाथाभाऊंच्या समर्थकांनी मुक्ताईनगरात बॅनरबाजीला सुरुवातदेखील केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांकडून झळकवण्यात आले आहे. तसेच एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.
दोन दिवसात खडसे राष्ट्रवादीत?
काही कारणास्तव एकनाथ खडसे राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकला. आता त्यांच्याकडून राजकीय सीमोल्लंघनासाठी नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. खडसे यांच्या मतदार संघात ताशा हालचाली पण सुरु झाल्या आहेत. तसेच खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रक्षा खडसे भाजपमध्येच थांबण्याची चिन्हं
एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारीदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. मात्र, एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा होऊन त्यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
घटस्थापनेचा मुहूर्त टळला
यापूर्वी एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला होता. यानंतर खडसे यांनी ‘प्रसारमाध्यमांनीच माझ्या प्रवेशाचा मुहूर्त काढला होता, तो चुकला’, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच मी अजून भाजपमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले होते.तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून खडसे भाजप सोडून जाणार नाहीत, असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाली असल्याचे समजते.