बहुजननामा ऑनलाइन – पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली सक्तवसुली संचलनालयाकडून तबलिगी जमात मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मौलाना साद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासातच ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
मौलाना साद यांच्या संस्थेला परदेशातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत आहे. त्याची माहिती सरकारला देण्यात आली नसल्याचा सक्तवसुली संचलनालयाला संशय आहे. त्यामुळे इडीकडून मौलाना साद यांच्या आठ सहकार्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरकजच्या सर्व खात्यांची छाननी केली जात आहे. मरकजला मिळालेला निधी मनी लॉण्ड्रिंगचा भाग होता की हवाला चॅनेल्सचा वापर करण्यात आला याचा तपास करत आहेत. दरम्यान आयकर विभागदेखील जाहीर न केलेले उत्पन्न, विश्वस्तांकडून आयकर चोरीचा प्रयत्न आणि निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करण्यात आला का ? याचा तपास करणार आहे. मौलाना साद अद्याप चौकशीसाठी क्राइम ब्रांचसमोर हजर झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांत मौलाना साद यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले असल्याचे लक्षात आले आहे.