पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लॉकडाऊनमध्ये स्वच्छ झालेली पुण्यातील हवा आता अनलॉकमध्ये पुन्हा प्रदुषित होऊ लागली आहे. शहरातील धुलीकणाचे प्रमाण 5 पटीने वाढले आहे. कोरोनोचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक, विमानाची उड्डाणे, रेल्वे, बांधकामे यातून पुण्यासह राज्यातील सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले होते.
पण गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील शहरामध्ये पुन्हा प्रदुषण वाढत असल्याचा निष्कर्ष दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्हायर्मेंट (सीएसई) अभ्यासातून निघाला आहे. या संस्थेने राज्यातील मुंबई, पुणे, कल्याणसह, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपुर, चंद्रपूर आणि सोलापूरमधील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला.
असा आहे निष्कर्ष
– पुण्यातील अतिसूक्ष्म धुलिकणाचे (पीएम 2.5) प्रमाण पाच पटीने वाढल्याची बाब समोर नुकतीच संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. राज्यातील प्रमुख शहरामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत पीएम 2.5चे प्रमाण सरासरीच्या तुलनेत कमी झाले आहे. मात्र अनलॉकनंतर तसेच हिवाळ्यात या घटकांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.
– या अभ्यासानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे शहरात सर्वाधिक पीएम 2.5 चे (45 प्रतिघन मीटर) प्रमाण आढळून आले. तर सर्वाधिक जास्त अतिसूक्षम धुलीकणांचे प्रमाण हे बृहनमुंबई येथे असल्याचे अभ्यासातून समजले आहे.
– लॉकडाऊन दरम्यान पीएम10 बरोबर पीएम 2.5 चे प्रमाणसुध्दा कमी झाले होते. परंतु हिवाळा सुरु झाल्याने एकूणच पीएम 10 मधील पीएम 2.5 टक्केवारीसह एकंदीरत दोन्हींची पातळी वाढली आहे.
अशी होते हवा प्रदूषित
हवेत 2.5 हे अतिसूक्ष्म आमि पीएम 10 हे सूक्ष्म धूलीकण हवेत तरंगत असतात. रस्त्यावरील धूळ, बांधकामे त्यातून हे धूलीकण हवेत पसरत असतात. हे कण श्वसनातून थेट फुफ्साच्या आतमध्ये जातात. त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. हिवाळ्यात या समस्यांची तीव्रता वाढते.