गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन – अंशकालीन स्त्री परिचरांना अत्यंत कमी मानधन दिले जाते. सदर मानधन वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासन गंभीर आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. असे आश्वासन खासदार अशोक नेते यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंशकालीन स्त्री परिचर संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे, कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, सहसचिव मधुकर सोनुने, सरचिटणीस सुरेश खाडे, वर्धा जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ तेलतुंबडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डी. एम. गौरकर, मधुकर सोनुने, आदी मान्यवर उपस्थित होते.
योगीता भांडेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्याचे महत्त्वाचे काम स्त्री परिचर करतात, तरीही त्यांना अंशकालीन समजले जाते. हा त्यांच्यावर होत असलेला फार मोठा अन्याय आहे. दिवाळी भेट देण्याबाबत आपण सकारात्मक आहोत, असे आश्वासन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.
अंशकालीन स्त्री परिचरांना केवळ १२०० रुपये मानधन दिले जाते. १९७२ मध्ये अंशकालीन स्त्री परिचराचे मासिक मानधन ५० रुपये व शिक्षकाचे वेतन ७२ रुपये होते. आज अंशकालीन स्त्री परिचराला केवळ मासिक १२०० रुपये मानधन मिळत आहे. तर शिक्षकाचे वेतन ६० हजार रुपयांवर गेले आहे. दोघांच्या वेतनातील तफावत लक्षात येते.
अंशकालीन स्त्री परिचरांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे २७ फेब्रुवारी रोजी बैठक लावून देण्याचे आश्वासन आमदार डॉ. होळी यांनी दिले.त्याचबरोबर मानधन वाढीचा मुद्दा आपणही रेटून धरू, असे आश्वासन डॉ. होळी यांनी दिले. त्यामुळे मानधन वाढीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.