नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नवीन मार्गदर्शक सूचना आणली आहेत. या नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. म्हणजेच अर्ज करण्यापासून लायसन्सच्या प्रिंटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असेल. याव्यतिरिक्त, मेडिकल सर्टिफिकेट, लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स वापरली जाऊ शकतात.
RC रिन्यूअलसाठीही सुविधा
अशा मार्गदर्शक सूचना आणण्यामागील हेतू नवीन वाहन नोंदणीची प्रक्रिया सुलभ करणे आहे. यासह नोंदणी प्रमाणपत्र ( RC ) रिन्यूअल आता 60 दिवस अगोदर करता येईल, याशिवाय तात्पुरती नोंदणी करण्याची मुदतदेखील 1 महिन्यावरून 6 महिने करण्यात आली आहे. त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने ‘लर्निंग लायसन्स’ प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओकडे जाण्याची गरज भासणार नाही, हे काम ट्यूटोरियलच्या माध्यमातून घरी ऑनलाईन करता येईल. हे पाऊल कोरोना साथीच्या काळात मोठा दिलासा देणार आहे.
वाढविण्यात आली DL, RC ची वैधता
मार्चच्या अखेरीस, वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्स ( DL), नोंदणी प्रमाणपत्र ( RC ), फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी मोटार वाहन कागदपत्रांची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. मंत्रालयाने एक परिपत्रक काढले आहे की संपूर्ण देशातील कोरोनाची परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात घेऊन 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झालेली ही कागदपत्रे येत्या 30 जून 2021 पर्यंत वैध मानली जातील.