मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून अजित पवार यांनी त्याबद्दल सांगताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
#मंत्रिमंडळनिर्णय –
१. दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या वाढीव उंचीच्या सुधारित प्रस्तावास मान्यता. pic.twitter.com/mIaiIau7PW— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 15, 2020
अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवण्यात येणार असून स्मारक विभागाकडून सर्व परवानग्या आठ दिवसात येतील. तसेच दोन वर्षात स्मारकाचे बांधकाम पूर्ण करणार आहोत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येईल. स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. देखणे, दिमाखदार स्मारक उभारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला, असेही अजित पवार यांनी सांगितले.
त्यामुळे आता दादर येथील इंदू मिल जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवण्याचा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून आता नवे सरकार येणाऱ्या काळात किती कालावधीत पूर्ण करणार हे भविष्यात कळेल. स्मारकाच्या पुतळ्याची उंची ३५० फूट असून स्मारकाची एकूण उंची ४५० फूट असेल, अशी माहितीही अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच मूर्तिकार राम सुतार यांच्या हस्ते या स्मारकाचे काम होणार आहे.