बहुजननामा ऑनलाइन टीम – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा पतंप्रधान होण्याचा मार्ग वेगळा आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजपमध्ये आपली एक प्रतिमा तयार करून पंतप्रधानपद मिळवले आहे. तर मनमोहन सिंग यांना सोनिया गांधीनी पंतप्रधान केले आहे, असे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (President Pranab Mukherjee)त्यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ आत्मचरित्रात नमूद केले आहे. नुकतेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात मुखर्जी यांनी आपल्यासोबत काम केलेल्या दोन्ही पंतप्रधानांची तुलना केली आहे.
द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने केले आहे. या पुस्तकातून काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे की, अनेक पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याचे तसेच त्यांना जवळून जाणून घेण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि शैली वेगळी होती. ते वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून होते तसंच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे होते. आपण राष्ट्रपती असताना जुलै 2012 ते मे 2014 दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मे 2014 पासून ते जुलै 2017 पर्यंत नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदींची प्रशासनशैली एकतंत्री!
मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान केले. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी 2014 मध्ये झालेल्या झालेल्या भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले. ते मुळात राजकारणी असून भाजपाने प्रचाराला सुरुवात करतानाच त्यांना पंतप्रधानपदाचं उमेदवार जाहीर केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आपली एक प्रतिमा तयार केली होती. त्यांनी पंतप्रधानपद मिळवलं आहे. प्रणव मुखर्जी यांनी यावेळी 2004 च्या निवडणुकीत युपीएच्या विजयानंतर सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्याचाही उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांना वारंवार काँग्रेस नेत्यांनी विनंती केल्यानंतरही त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला आणि मनमोहन सिंग यांच्या नावाची घोषणा केली असे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले आहे.