मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचं आत्मभान देणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) ६३वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिक एकत्र आले आहेत.
बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीतं गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत आहेत. कविसंमेलनांमधूनही महामानवाला अभिवादन केलं जात आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत.
या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. त्यांच्यासोबतच अनेक राजकीय नेतेमंडळीसुद्धा येथे उपस्थित राहणार आहेत. एकिकडे संपूर्ण कुटुंबासह बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणाऱ्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे प्रशासनाकडून या प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे.
Visit : bahujannama.com