डॉ. ऑमव्हेट यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : बहुजननामा ऑनलाइन –परदेशातून भारतात येऊन फुले-आंबेडकर यांच्या कार्यावर डॉ. गेल ऑमव्हेट यांनी प्रबंध लिहिला. बहुजनांच्या चळवळीला आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्याला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे महत्वाचे काम डॉ. ऑम्व्हेट यांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे विचारविश्वात आमूलाग्र बदल झाला. आता बहुजन तरुणांनी पुढे येत हे कार्य आणि विस्तारावे,” असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑमव्हेट यांना डॉ. कसबे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबडेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात गंगाधर पानतावणे विचारपीठावर प्रसंगी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर, संमेलनाचे प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, दीपक म्हस्के, प्रा. किरण सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत पाटणकर म्हणाले, “काहीतरी नवीन शोधले पाहिजे असे दोघांना वाटायचे. आज मी जो काही आहे तो फुले, आंबेडकर, बुद्ध यांच्यामुळे आहे. आंबेडकर यांना जेवढा मार्क्सवाद पटला, तेवढाच मलाही पटला, हे गेलमुळे समजले. या चळवळीत गेलची साथ मिळाली. तिने कधी कुरकुर केली नाही. बाजारूपणा नाकारून ती इथे आली. तिच्यामुळे आंबेडकरांच्या सिद्धांताकडे वळलो. हा धागा एका सहचारीपणाचा आहे. २५ वर्षांपूर्वी बौद्ध झालो त्याचा मार्ग गेलमुळे सापडला.पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गेल ऑमव्हेट म्हणाल्या, “समता, ममता आणि करुणा ही आपली शक्ती आहे. या शक्तीच्या बळावर चळवळ पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे. या पुरस्काराने सतत कार्यशील राहण्याची ऊर्जा मिळाली आहे. परशुराम वाडेकर यांनी स्वागत केले. डॉ. विजय खरे यांनी प्रास्ताविक केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण सुरवसे यांनी आभार मानले.