मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत असून सर्वात पहिले राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर कॅबिनेट मंत्री शपथ घेत असताना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या शपथविधी दरम्यान राज्यपाल कोश्यारी अचानक भडकले.
वर्षा गायकवाड या शपथविधी घेताना सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुढे-मागे काही बोलू नका, असे म्हणत शपथविधीसाठी कागदावर दिलेला मजकुर वाचायचे आवाहन वर्षा गायकवाड यांना केले. यानंतर वर्षा यांनी ठरवून दिल्याप्रमाणे शपथ घेतली. तसेच शपथ पूर्ण झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी आपले श्रद्धास्थान असलेल्या महापुरुषांची नावे घेऊन शपथ घेतली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी आगे-पिछे कुछ नहीं बोलना, असे ठणकावून सांगत इतर नावे न घेण्यास सांगितले.