बहुजननामा ऑनलाईन टीम – शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून रुग्णसेवेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मानसिक स्थिती ठीक नसल्याने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर डॉक्टराकडूनच विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे़. याबाबत राजगुरुनगर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने एम जे एम हॉस्पिटलमधील डॉ़.रोहन जहागिरदार यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०१७ ते जुलै २०१९ दरम्यान हि घटना घडली आहे़. पीडित तरुणी मानसिक रुग्ण आहे. घोले रोडवरील एम जे एम हॉस्पिटलमधील डॉ़.जहागिरदार यांच्याकडे ती उपचार घेत होती़. परंतु उपचारादरम्यान आरोपी वेळोवेळी तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत असे. एक दिवस तर तरुणीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे असे सांगून अन्य एका हॉस्पिटलमधील संचालकाच्या घरी घेऊन गेला़ आणि तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला़. तसेच कोणाला न सांगण्याची धमकी देत , मोठे अधिकारी, राजकारणी ओळखीचे आहेत, असे सांगितले.
दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीच्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तसेच या प्रकारचा अधिक तपस सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.