सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधातील राजकारणामुळं बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले आहेत. एका गटाने आंबेडकर भाजपला पूरक आहेत अशी भूमिका घेऊन आरोप करत विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना पक्षाला फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
बहुजन समाज पक्ष हा बाबासाहेब यांच्या विचारधारेतून उभा राहिलेला पक्ष आहे जर बाबासाहेबांच्या घराण्यातील व्यक्तीच्या विरोधात बसपा उमेदवार देत असेल तर ते योग्य होणार नाही. आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, यासाठी प्रभारी महासचिव अॅड. संजीव सदाफुले यांना विनंती पत्र देणार असून, जर भूमिका बदली नाही तर मी पक्षाचा व प्रसंगी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, अशी आक्रमक भूमिका आनंद चंदनशिवे यांनी जाहीर केली आहे.
त्यामुळे माझ्या बोलण्याचा पक्षश्रेष्ठींनी विचार करावा, अन्यथा आंबेडकर या नावाच्या विरोधात जाणे आपणांस तरी शक्य नाही. पक्षाने दबाव वाढविल्यास आपण आपल्या सहकारी चार नगरसेवकांसह पक्षाचा राजीनामा देऊ असा इशाराही चंदनशिवे यांनी स्वतःच्या पक्षाला दिला आहे.