मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रात व राज्यात सत्ता असताना शिवसेना भाजपमध्ये मागठाणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पुर्व येथे केतकी पाड्यात टॉयलेटच्या उद्धाटनावरून चांगली जुंपली. दोन्ही गटांकडून आपणच या टॉयलेटसाठी वनविभागाकडून परवानगी घेतल्याचा दावा केला आहे.
धारवाडी एमएलडीसी कंपाउंड येथे बांधण्यात आलेल्या शौचालयाचे उद्धाटन स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते आज सायंकाळी चार वाजता केले जाणार होते. त्यावेळी विभागात सर्वत्र फलकबाजी करण्यात आली. मातर् भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनीही सकाळी अकरा वाजता उद्घाटनाचा फलक या परिसरात काल सायंकाळी लागवला.
याची कुणकुण लागताच आज सकाळी शिवसैनिकांसह आमदार प्रकाश सुर्वे, विभागप्रमुख विलास पोतनीस, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, संजना घाडी आदी जमले. तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता, प्रकाश दरेकर, प्रदिप नायर सहित कार्यकर्ते व पदाधिकारी तेथे जमले होते. यावेळी सेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी पोलीसांना पाचारण करण्यात आले. काही काळ पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.