कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – डॉ. प्रकाश आंबेडकर हे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता सोलापूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान आज आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा सोलापूर आणि मंगळवेढा भागात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. या सभेकरिता जात असताना वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक अनिल म्हमाणे यांच्या गाडिची अडवणूक करून तपासणी केली. गाडीत काहीच न आढळून आल्याने संबंधित आधिकऱ्यांनी म्हमाणे यांना थेट गाडीचे कोचिंग फाडण्याची धमकी दिली. त्यावरून म्हमाणे आणि तपास अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे तपास करणाऱ्या आधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, २८ मार्च २०१९ रोजी सोलापूर आणि मंगळवेढा येथे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार दौरा होत आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी स्टार प्रचारक अनिल म्हमाणे, प्रवक्ते प्रा. कपिल राजहंस, कायदा आघाडीचे ऍड. सरदार किरवेकर, प्रसिद्धी प्रमुख राहुल राजहंस, डॉ. दयानंद ठाणेकर आज पहाटे हुपरी मार्गे इचलकरंजी कडे येत होते, त्यावेळी पंचगंगा नदी पुलावर असणाऱ्या पोलीस चेक पोस्ट वर गाड्या अडवून तपासणी करण्यात येत होती.
त्याचवेळी म्हमाणे यांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतर संबांधीत अधिकाऱ्यांनी वंचित आघाडी चे पदाधिकारी असल्याचे समजताच मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला अशी भावना अनिल म्हमाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हुज्जत घालत गाडीचे कोचिंग फोडण्याची भाषा वापरली त्यामुळे तपास अधिकाऱ्यांच्या आरेरावीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.