नांदेड :-(माधव मेकेवाड) : किनवट येथील एका प्रकरणात गुन्हा दाखल करु नये यासाठी किनवटचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. १४ जूनच्या रात्री याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे तक्रार केल्यानंतर एका खासगी निवासस्थानी सदरची रक्कम देण्याचे ठरले. दिलीप तिडके यांच्यासोबत त्याठिकाणी पोलीस नाईक मधुकर पांचाळ, पोलीस शिपाई पांडूरंग बापूराव बोईनवाड हे दोघेही होते.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पांचाळ व बोईनवाड यांना अटक केली खरी मात्र पोलीस निरीक्षक दिलीप तिडके हे तेथून फरार झाले. याचवेळी त्यांच्या घरातून ४ लाख ७२ हजार रुपयांची बॅग घेवून पळून जाणाऱ्या मिराशे नावाच्या व्यक्तीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पांचाळ व बोईनवाड यांच्या अटकेनंतर किनवट येथे किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेंव्हापासून दिलीप तिडके हे फरार होते.आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अपीलही दाखल करण्यात आले होते. मात्र २९ जून २०१९ रोजी त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायाधीश एस.एस.खरात यांनी फेटाळून लावला होता.
बुधवारी दुपारी दिलीप तिडके यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. जो व्यक्ती घरातून ४ लाख ७२ हजार रुपयांची बॅग घेवून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता या प्रकरणाची देखील चौकशी यानिमित्ताने होणार आहे. दिलीप तिडके यांची पूर्ण चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कळवले आहे.