अकोले : बहुजननामा ऑनलाईन – ते सांगतात विकास करण्यासाठी गेलो. 40 वर्षे गवत काढले काय ? असा सवाल करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर निशाणा साधला आहे. अकोल्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ किरण लहामटे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. रविवारी बाजार तळावर ही सभा पार पडली.
‘मग त्यांनी 40 वर्षे गवत काढले काय ?’
शरद पवार म्हणाले, “अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केलं. भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादी सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी 40 वर्षे गवत काढले काय ?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘त्यांना धडा शिकवण्याची संधी सोडू नका. डॉ. लहामटे यांना साथ द्या’
पुढे बोलताना पवार म्हणाले, “आदिवासींसाठी आम्ही केलल्या कायद्याचं उल्लंघन करून त्यांनी भलत्याच तालुक्यात विकास केला. त्याचे शुल्ककाष्ट मागे लागू नये म्हणून ते तिकडे गेले. त्यांना धडा शिकवण्याची संधी सोडू नका. डॉ. लहामटे यांना साथ द्या.” असे आवाहनही पवारांनी केले.
‘गेल्या 5 वर्षांत राज्याची अधोगती झाली आणि बेकारी वाढली’
आपण केलेल्या कामाबद्दल सांगताना शरद पवार म्हणाले, “आदिवासींच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. महिलांना 50 टक्के आरक्षण दिलं. हमी कायदा, मंडल आयोग अंमलबजावणी, शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कामे मी मुख्यमंत्री असताना केली. राज्यातील औद्योगिक वसाहतींना चालना देत बेरोजगारी कमी करण्यासाठी काम करताना राज्य देशात एक नंबरवर नेऊन ठेवले. गेल्या 5 वर्षांत राज्याची अधोगती झाली आणि बेकारी वाढली” असा आरोपही पवारांनी केला.
Visit : bahujannama.com