धुळे : बहुजननामा ऑनलाईन – हातात पिस्तूल घेऊन फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करणे एका तरुणाला महागात पडले आहे. विशेष म्हणजे मित्राच्या आगाऊपणाची दोन तरुणांना देखील चांगलीच अद्दल घडली आहे. धुळे शहरातील भीमनगर परिसरात राहणार्या दीपक शिरसाट याने गावठी कट्टा हातात घेत एक व्हिडिओ तयार केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ पोलिस अधिक्षकांपर्यं पोहचला.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कारवाईचे आदेश दिले. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला लागलीच अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य दोन साथीदार मित्र पंकज परशराम जिसेजा व अभय दिलीप अमृतसागर याचे नाव सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अभयकडून पुन्हा एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दोन्ही पिस्तूलची किंमत एकूण 71 हजार 500 रूपये आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ही गावठी पिस्तूल कुठून आणल्या आणि या माध्यमातून त्यांनी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास आत्ता पोलीस करीत आहेत.