बहुजननामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशमधील २६ अब्ज भविष्य निर्वाह निधी (PF) घोटाळ्यात यूपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे (UPPCL) माजी एमडी एपी मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. यूपी पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान यूपीपीसीएलचे एमडी आणि सचिव उर्जा अपर्णा यू यांना हटविण्यात असून त्यांच्या जागी एम देवराजची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हजरतगंज पोलिसांनी कारवाई करत एपी मिश्रा यांना अलिगंज येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. एपी मिश्रा यांची पोलिस अधिकाऱ्यांकडून अज्ञात ठिकाणी चौकशी केली जात आहे. सरकारने या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
भविष्य निर्वाह निधी घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरकारने अपर्णा यू यांना उत्तर प्रदेश ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि ऊर्जा सचिव पदावरून काढून टाकले आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आलेल्या एम देवराज यांना आता सचिव ऊर्जा व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अपर्णा यू यांना पाटबंधारे व जलसंपदा सचिव करण्यात आले आहे. या घोटाळ्यामध्ये यूपी पॉवर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व प्रधान सचिव ऊर्जा आलोक कुमार यांनादेखील हटवले जाऊ शकते, अशी चर्चा रंगवली जात आहे. ते ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्य निर्वाह निधी घोटाळ्याबाबत उर्जा मंत्री श्रीकांत शर्मा पॉवर कॉर्पोरेशन व्यवस्थापनाच्या वृत्तीवर संतप्त आहेत. अशा परिस्थितीत हे प्रकरण समोर आल्यानंतर जिथे सीबीआयने चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, तेथे आता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले गेले आहे.
ईओडब्ल्यू टीमने सोमवारी तुरूंगातील यूपीपीसीएलचे माजी संचालक वित्त सुधांशु द्विवेदी आणि तत्कालीन यूपीपीसीएल ट्रस्टचे सचिव पीके गुप्ता यांची चौकशी केली. डीएचएफएलमधील गुंतवणूकीस मान्यता देण्यास जबाबदार असणाऱ्याला पकडण्याची तयारी असल्याचे म्हंटले जात आहे. आता एपी मिश्राच्या अटकेनंतर इतरही अनेक अधिकाऱ्यांचिही चौकशी केली जाऊ शकते.
दुसरीकडे उत्तर प्रदेशातील वीज कर्मचार्यांनी भविष्य निर्वाह निधी घोटाळ्याचा निषेध करण्याचा निर्णय घेतला असून १८ नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या कामांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
एपी मिश्रा हे यूपीपीसीएलचे माजी एमडी राहिले आहेत. ते मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. २०१२ मध्ये अखिलेश सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच आयएएसच्या जागी अभियंता ए.पी. मिश्रा यांना यूपीपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक केले गेले. मिश्रा पूर्वांचल आणि मध्यांचलचे एमडी देखील राहिले आहेत. एवढेच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर त्यांना तीन वेळा सेवा विस्तारही मिळाला.