अमळनेर : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाजाला लवकरच आरक्षण देणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी अमळनेर येथील एका खाजगी कार्यक्रमात दिले. येथील आल्हाद नगर भागात बन्सीलाल भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सर्व समाजातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पो. नि. हिरामण कंखरे हे उपस्थित होते. व्यासपीठावर राजाभाऊ कोतारे, उल्हास आडणारे, रवी पवार, तुषार वाघुळदे, राजू चौधरी, पंकज धनगर, शीतल चिंचोरे, संदीप घोरपडे, मगन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी साई गजानन परिवारातर्फे देखील जानकर यांचा गौरव करण्यात आला. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे कवी रमेश पवार व दुग्ध तंत्रनिकेतन या विषयावर पुस्तक लिहिणारे लेखक धीरज कंखरे तर बन्सीलाल भागवत यांचा सपत्नीक सत्कार जानकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बन्सीलाल भागवत, राजाभाऊ कोतारे, हिरामण कंखरे आदिंनी मनोगते व्यक्त केली.
जानकर म्हणाले की, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विविध ठिकाणी निवडणुका लढविल्या. सर्व ठिकाणी पराभूत झालो, मी मात्र जवळ गेलो प्रकाश मात्र पक्षाला मिळत गेला आता दोन आमदार या पक्षाचे असून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यावरदेखील पक्षाचे वर्चस्व राज्यात निर्माण झाले आहे. भाजप सेना सरकार ९९ टक्के धनगर समाजाने मतदान केल्यामुळे सत्तेत बसलेले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या समाजाला विसरून या राज्यात सरकार येणार नाही, हे सत्ताधाऱ्यांना चांगले माहित आहे.
त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नदेखील सुरू केले आहेत. कायद्याच्या बाबतीत विविध अभ्यास सुरू असून आदिवासींवर अन्याय न होता आरक्षण देण्याचे काम शासनातर्फे केले जात आहे; याचबरोबर ठाकूर समाजासह अनुसूचित जातींमध्ये २२ जातींचा अभ्यास केला जात असून धनगर समाजाला लोकसभा निवडणुकीपूर्वीच आरक्षण मिळेल, असा आपल्याला विश्वास असल्याचे मत जानकर यांनी यावेळी व्यक्त केले. १२० कोटींचे असलेले बजेट माझ्या कारकीर्दीत साडेसात हजार कोटींपर्यंत नेऊन ठेवले आहे. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.