अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – धनगर आरक्षण समितीच्या वतीने आयोजित केलेल्या आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षण समाजाचा मुद्दा समोर येताना दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब म्हणून अमरावतीत आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून पहिल्याला मिळाले. आंदोलनात खासदार विकास महात्मे, धनगर नेते संतोष महात्मे प्रामुख्याने सहभागी झाले होते. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला खासदार विकास महात्मे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर आंदोलनस्थळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली.
आता धनगर समाजाला आधी आरक्षण मिळेल त्यानंतरच निवडणूक आणि नवीन सरकार येईल, असा निर्धार करण्यात आला. खासदार विकास महात्मे यांनी केंद्र सरकार धनगरांना आरक्षण देण्याच्या तयारीत असून येत्या २५ दिवसांत धनगरांना आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आजचे आंदोलन हे सर्वसामान्य समाज बांधवांनी आयोजित केले आहे. समाजाच्या भावनेची दखल सरकारला घ्यावी लागेल असेही खासदार महात्मे म्हणाले.
आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, नगरसेवक दिनेश बूब यांनी भेट दिली. या आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इर्विन चौक येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.