बहुजननामा ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर एका महिलेने केलेला बलात्काराचा आरोप आणि महिला अत्याचारांच्या घटनांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावर बलात्कारासारखे आरोप होणे गंभीर आणि धक्कादायक आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता चौकशी करावी. संबधित महिलेने केलेल्या आरोपात काही जर तथ्य असेल आणि मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणे शिक्षा व्हावी, असे वाघ म्हणाल्या.
राज्यात एका दिवसात सामूहिक बलात्काराच्या तीन घटना घडतात. महाराष्ट्र कुठे चालला आहे. औरंगाबाद आणि माहिमच्या केसमध्ये गुन्हा दाखल होऊनही सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी पक्षाच्या महिला अत्याचारांचा आरोप असणाऱ्या आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे महिलांवर अत्याचार करण्याचे मनोबल वाढत असल्याचा आरोप वाघ यांनी केला. पोलीस आणि सरकराची महिलांबद्दलची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत राज्यातील महिला आणि लेकीबाळी सुरक्षित राहणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
पोलिसांनी सत्य बाहेर आणावं: फडणवीस
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. पोलिसांनी तात्काळ या संदर्भातील सत्य बाहेर आणावे. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आणले की, आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.