Dhananjay Munde | मागील तीन दिवसांपासून धनंजय मुंडेंची अधिवेशनाला दांडी, नेमके गेले कुठे?

December 20, 2024

नागपूर: Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) संपूर्ण राज्यभर चर्चेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी गुरुवार (दि.१९) हे प्रकरण विधानसभेत मांडले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Assembly Session)

या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. कराड यांच्या माध्यमातून नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला जात असून मुंडे मात्र गेली तीन दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थित नसल्याने चर्चा विविध तर्कवितर्क काढले जात आहेत.

धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हे आपले जवळचे कार्यकर्ते असल्याचे मान्य केले होते. विधानसभेतही सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्या आडून नाव न घेता मुंडेंवर निशाणा साधला होता. याशिवाय विरोधकांनीही या घटनेमागे वाल्मिक कराड असल्याचे म्हंटलेले आहे, त्यामुळे कराड यांचे नाव दिवसेंदिवस या प्रकरणात पुढे येताना दिसत आहे.

एकीकडे कराड यांच्यावर आरोप होत असताना दुसरीकडे धनंजय मुंडे यांचीही गेली तीन दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थिती नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंडे नेमके कुठे गेले? असा सवाल उपस्थित केला जातोय. हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करणारे धस यांनीही तर धनंजय मुंडे यांनी तर माध्यमांसमोर उपस्थिती लावावी, समाजासमोर यावे, असे जाहीर आव्हान केले आहे.

सुरेश धस म्हणाले, “धनंजय मुंडे हे त्यांचे शागीर्द आहेत. त्यांच्या शागीर्दवर एवढं सगळं होत असताना ते कुठे लपून बसले आहेत ते मला माहिती नाही. त्यांनी माध्यमांसमोर यायला पाहिजे. एखाद्या मंत्र्याला समाजाला तोंडसुद्धा दाखवू वाटत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर समाजापुढे यावे, अशी माझी विनंती आहे. मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडेंना फेअर केले जाईल, असे मला वाटत नाही.

आमचा देवेंद्र फडणवीस आणि न्यायालयावर विश्वास आहे. या प्रकरणाची डबल चौकशी लावली आहे. एक न्यायालयीन, तर दुसरी आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली चौकशी होणार आहे. केवळ पोलिस चौकशी लावली असती तर फेअर केलं गेलं असतं. पण न्यायालयापुढे कोण फेअर होईल. न्यायालयीन चौकशीमुळे आमचं संपूर्ण समाधान झालं आहे”, असे धस यांनी म्हंटले आहे.