नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – आजपासून महाविहार, बावरीनगर, दाभड येथे पू. भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ३२ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध असलेल्या आणि शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेले बुद्धकालीन बावरी ब्राह्मणाचे स्मरणार्थ बावरीनगर म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या महाविहार बावरीनगर येथे दरवर्षी धम्म परिषद होते. आज २० रोजी परिषदेचे उदघाटन अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष पू. भदंत सदानंद महाथेरो सदधम्मादित्य (केळझर) यांच्या हस्ते तर धम्म ध्वजारोहण भदंत आर्यवंश महाथेरो (नेपाळ) यांच्या हस्ते होईल. ‘संबोधी २०१९’ या स्मरणिकेचे प्रकाशन बौद्ध गया येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे महासचिव भदंत प्रज्ञादीप महाथेरो यांच्या हस्ते होणार आहे.
त्रिरत्नवंदना, परित्राण पाठ होईल. महाबोधी वंदना, धम्म ध्वजारोहण होईल. दुपारी दोन वाजता नांदेड शहरातून महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतमेची धम्म मिरवणूक निघेल. मिरवणुकीत पू. भिक्खू संघ व नागसेन हायस्कूलच्या मुलींचे लेझिम पथक असेल. सायंकाळी सात वाजता धम्म परिषदेचे उदघाटन होईल. त्रिपिटकाचे सार, निर्वाण म्हणजे काय, बोधिसत्व कसे होतात आणि वर्तमानकाळात बौद्ध धम्मानुसरण आदी विषयांवर धम्म परिषदेमध्ये पूज्यनीय भिक्खू संघाचा धम्म उपदेश होईल.
दि. २१ रोजी सकाळी वधू-वर परिचय मेळावा, सामूहिक मंगल परिणय, व्यसनमुक्ती प्रतिज्ञा, धम्मज्ञान स्पर्धेतील गुणवंताना बक्षीस वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. या दोन दिवसीय धम्म परिषदेत पू. भदंत सत्यशील महाथेरो, भदंत शरणानंद महाथेरो, भदंत अंगुलीमल महाथेरो, भदंत सुमेधबोधी महाथेरो, भदंत बोधीपलो महाथेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत आर्यवंश महाथेरो, भदंत चंदरतन महाथेरो, भदंत महापंथ महाथेरो, भदंत काश्यप महाथेरो, भदंत प्रज्ञादीप महाथेरो, भिक्खू ज्ञानदीप थेरो, भिक्खू डॉ. ए. सत्यपाल थेरो, भिक्खू महेंद्र थेरो (कुशीनगर), भिक्खू एस. कश्यापायन थेरो (जयसिंगपूर), भिक्खू ज्योतीरत्न थेरो (नागपूर), भिक्खू विनयबोधिप्रिय थेरो, भिक्खू धम्मनंद थेरो (बिदर), भिक्खू महाविर्यो (अहमदपूर), भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद), भिक्खू धम्मशील (सारनाथ), भिक्खू बुद्धदत्त (बंगरुळू) आदी देश – विदेशातील विद्वान भिक्खंची धम्मदेसना होईल.
धम्म परिषदेनिमित्त मोफत आरोग्य शिबीर तसेच इतर प्रासंगिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.