Devendra Fadnavis On Anil Deshmukh | वेळ आल्यास अनिल देशमुखांचे ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा फडणवीसांचा इशारा

July 24, 2024

मुंबई: Devendra Fadnavis On Anil Deshmukh | भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव (Shyam Manav) आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांना फडणवीसांनी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले आहे.

https://www.instagram.com/p/C9zhraKJqlZ

फडणवीस म्हणाले , ” श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षांपासून ओळखतात त्यामुळे आरोप करण्याअगोदर त्यांनी बोलायला हवं होतं. मात्र एका इकोसिस्टममध्ये सुपारी घेऊन आरोप करणारे लोक आहेत. दुर्दैवाने श्याम मानव या लोकांच्या नादी लागल्याचं दिसत आहे. अनिल देशमुख यांची चौकशी लागली तेव्हा राज्यात आमचं सरकार नव्हतं.

मुंबई हायकोर्टाच्या (Mumbai High Court) मुख्य न्यायाधीशांसमोर अनिल देशमुख यांची चौकशी लागली आणि हायकोर्टाने देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला लावला. महाविकास आघाडी सरकारमध्येच (Mahavikas Aghadi) देशमुख यांच्या विरोधात एफआयआर झाला. आणि ते तुरुंगात गेले. देशमुख हे निर्दोष म्हणून तुरुंगाबाहेर आले नसून ते जामिनावर बाहेर आहेत “, असा पलटवारही फडणवीसांनी केला आहे.

“सीबीआयने (CBI) आता जी चार्जशीट तयार केली आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की, गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांवर (Jalgaon SP) दबाव टाकला होता. तसंच महाजन (Girish Mahajan) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यास सांगितले होते. यासंदर्भातील ऑडिओ-व्हिडिओ पुरावे मी दिले होते.

या पुराव्यांच्या आधारेच सीबीआयकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणात सीबीआयने पुराव्यांसहित कोर्टात चार्जशीट दाखल केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांवर गुन्हे दाखल करणे, मोक्का लावणे यासंदर्भातील कट रचला जात होता, हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे,” असे म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला आहे.

अनिल देशमुख यांना इशारा देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “मी एखाद्यावर राग ठेवून राजकारण करत नाही. मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण माझ्या वाट्याला कोणी गेलं तर मी त्याला सोडत नाही. अनिल देशमुख यांच्या पक्षाच्याच काही लोकांनी मला ऑडिओ- व्हिडिओ आणून दिले आहेत. त्यात अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) काय बोललेत, शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत काय बोललेत, सचिन वाझेवर काय बोललेत, हे सगळं आहे. माझ्यावर वेळ आली के हे व्हिडिओ मी सार्वजनिक करणार आहे.”

अनिल देशमुखांचे फडणवीसांवर नेमके आरोप काय?

प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, ” तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिले. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आले. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) अडचणीत आले असते “, असा दावा देशमुख यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, ” त्यांनी मला सांगितले होते की उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितले की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिले. अजित पवारांवर गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा, अनिल परबांवरही खोटा आरोप लावायचा असे मला सांगण्यात आले. मी त्याला नकार दिल्यामुळे माझ्यावर ईडी व सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली “, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता.