बहुजननामा ऑनलाईन टीम – दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारची महत्वाची बैठक पार पडली. रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना( devendra fadnavis) असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील (MVA Goverment) उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली . या बैठकमध्ये कोण कोणत्या नेत्यांची सुरक्षा वाढवायची आणि कपात करायची याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(sunetra pawar) यांना पहिल्यांदाच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
याआधी सुद्धा अजित पवार हे आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांना पहिल्यांदाच सुरक्षा देण्यात आली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल असताना सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे ती आधी वाय प्लस सुरक्षा होती.
त्याचबरोबर आमदार वैभव नाईक हे नारायण राणे यांचे विरोधक आहे म्हणून त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे. युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना प्रथमच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसंच कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांची सुरक्षा वाढवली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.