लखनऊ : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून आक्रमक प्रचार केला जात आहे. भाजपाकडून दिल्लीतील प्रचारासाठी स्टार प्रचारकांची फौज उतरवली जात आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा या रणधुमाळीत उतरणार आहेत. यूपीचे सीएम दिल्लीच्या मुस्लिम बहुल भागात प्रचार करू शकतात, ज्यामध्ये जामिया नगर आणि शाहीन बाग सुद्धा असू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत भाजपाचे संपूर्ण लक्ष मतांच्या ध्रुवीकरणावर आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. दिल्लीतील शाहीन बाग परिसर हा सध्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाची ओळख झाला आहे. भाजपा यास देशविरोधी कट सांगून निवडणुकीचा मुद्दा बनवत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या सभा जामिया नगर किंवा शाहीन बाग परिसरातूनच सुरू होतील. 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत डझनभर अशा सभा होणार आहेत, ज्या अशा भागात होतील जेथे मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणात असतील.
कोणत्या भागात रॅली करणार यूपी सीएम?
भाजपाचे फायर ब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांच्या चार दिवसात 12 रॅली होणार आहेत. सध्या त्या 4 विधानसभा मतदार संघात होणार आहेत. परंतु, त्यांची संख्या वाढवली जाऊ शकते.
योगी आदित्यनाथ प्रचाराची सुरूवात जामिया नगर, शाहीन बाग, चांदबाग, मुस्तफाबाद सारख्या परिसरातून होईल. परंतु, पक्ष आता त्यांच्या सभा वाढविण्यावर सुद्धा विचार करत आहे. यापूर्वी सुद्धा योगी आदित्यनाथ यांना पक्षाने दुसर्या राज्यात प्रचारासाठी उतरवले आहे.
योगींच्या भाषणातील आक्रमक शैलीमुळे त्यांना कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा मोठी मागणी होती. दिल्लीत अगोदरच बीजेपी शासित राज्यांचे सीएम, केंद्रीय मंत्री, 200 पेक्षा जास्त खासदार प्रचाराला लागले आहेत.
दिल्लीच्या शाहीन बागमध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरूद्ध मागील सुमारे 45 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्ली भाजपाकडून यास निवडणुकीचा मुद्दा करण्यात आले आहे. भाजपाने आरपारची लढाई सुरू केली आहे. भाजपाकडून दिल्लीत प्रचारासाठी उतरलेल्या नेत्यांनी आतापर्यंत आपल्या वक्तव्यातून शाहीन बागची तुलना शैतान बाग, तौहीन बाग, मिनी पाकिस्तान या सारख्या शब्दांनी केली आहे.