नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत असताना दुसरीकडे पेट्रोल – डिझेलच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसले आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाला दिलासा मिळणार असून ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत सलग दुसऱ्या आठवड्यात कपात केली आहे. त्यामुळेच पेट्रोल – डिझेल पाच महिन्यांपूर्वीच्या भावावर मिळत असून दिल्लीत एक लिटरचे पेट्रोलचा दर ७२ रुपये आणि डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर आहे. तसेच नवीन वर्षात आतापर्यंत यात ४ रुपये प्रतिलिटर घसरण झाली आहे.
सध्या दिल्लीत पेट्रोल ७१.९४ रु. तर डिझेल ६४.८७ रु. प्रतिलिटर असून मुंबईत पेट्रोल ७७.६० रु. प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल ७४.५८ रु. तर चेन्नईत ७४.७३ रु. प्रतिलिटर आहे. परदेशी बाजारात कच्च्या तेलात घसरण झाल्यामुळेही पेट्रोल – डिझेलचे भाव कमी झाले आहेत. तसेच त्याचा प्रभाव घरगुती बाजारावरही पडला आहे. मागच्या महिन्यात क्रूड ऑइल ३० टक्क्यांनी स्वस्त झाले होते.
सध्या चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरातील व्यवसायावर परिणाम होत असून कच्च्या तेलाचे भावही त्यामुळेच घसरले असल्याचे समजते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची मागणी कमी झाली असून त्याचा प्रभाव किमतीवर पडत आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसातच कच्चे तेल आणखी स्वस्त होईल, असे बोलले जात आहे.