नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असून निवडणुकीत उतरलेल्या तीनही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरु आहे. आपल्या तयारीमध्ये कोणतीही कमी पडू देत नसून पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. एवढेच नाही तर उमेदवारांचे कुटुंब सदस्यही त्यांना प्रचारासाठी मदत करत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतील सर्व भागात आपचा प्रचार करत असून त्यांच्या पत्नी सुनीता याही आता केजरीवालांच्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी या माजी आयआरएस अधिकारी असून त्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या प्रचारात प्रवेश केला आहे. सुनीता या गल्ली, कोपरा आणि कॉलनीपासून ते महिला मेळाव्यापर्यंत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मतं मागण्यासाठी प्रचार करत आहेत. सुनीता केजरीवाल यांनी सकाळची सुरुवात महिला मोहल्ला सभेने करत आपचे गॅरंटी कार्ड काय आहे आणि केजरीवाल यांना मतदान का करावे, याबद्दल त्यांनी सांगितले.
प्रचारासाठी बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ असून घरातील जबाबदारी इतकी मोठी होती की नोकरीचा राजीनामा द्यावा लागला, असे सुनीता यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. संभाषणादरम्यान सुनीता केजरीवाल यांनी आपल्या पतीबरोबर नात्याची सुरूवात कशी झाली आणि काही वैयक्तिक गोष्टीही सार्वजनिकरित्या सांगितल्या. त्यांनी सांगितले की आयआयटीमध्ये असताना त्यांची भेट झाली, दोघे बर्याचदा भेटले आणि मग एक दिवस अरविंद केजरीवाल यांनी त्यांना प्रपोज केले.
Visit : bahujannama.com