मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नुकतेच नदीम-श्रवण या जोडीतील श्रवण अर्थात श्रवणकुमार राठोड यांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतर संगीत क्षेत्राला काल आणखी एक धक्का बसला. राजन-साजन मिश्रा या प्रसिद्ध जोडीतील पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे रविवारी (दि.25) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झालं. राजन मिश्रा यांचे हृदविकाराच्या झटक्याने दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयात वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. मात्र त्यांना वेळेवर व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांना किडनीची समस्या असल्याने त्यांचे डायलिसीस करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराच झटका आला, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मात्र तेथे त्यांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला नाही. येथे असलेले सहाच्या सहा बेडवर अगोदरच रुग्ण होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सांगण्यावरुन नातेवाईकांनी इतर रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडसाठी चौकशी केली. त्याशिवाय सोशल मीडियावरुनही मदतीची याचना केली.
व्हेटिलेटर बेड उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु असताना नातेवाईकांनी सर गंगाराम हॉस्पिटलचे चेअरमन डी.एस. राणा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एक व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था केली. परंतु, पंडितजींची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना इतरत्र हलवणे योग्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशीरा व्हेंटिलेटरची व्यवस्था होत होती. पण, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे समाज माध्यमांवर पंडित मिश्रा यांच्या निधनानंतर संताप व्यक्त होत आहे. विषेश म्हणजे खासदार, मंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत अनेकांनी पंडितजी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोण होते राजन मिश्रा?
राजन मिश्रा भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. 2007 मध्ये भारत सरकारकडून कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. बनारस घराण्याशी ते संबंधित होते. 1978 मध्ये श्रीलंकेत त्यांनी पहिला संगिताचा कार्यक्रम केला. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्विझरलँड, ऑस्ट्रिया, संयुक्त राज्य अमेरिका, ब्रिटेन, यूएसएसआर, कतार, बांगलादेशासह इतर अनेक देशात संगिताचे कार्यक्रम केले.