नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसोबत पकडण्यात आलेला डीएसपी दविंदर सिंहची एनआयएकडून दिल्लीत चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दविंदरसोबत दोन हिजबुलचे दहशतवादी सुद्धा पकडण्यात आले होते. यापैकी एक नवीद अहमदला दविंदर मागील सात वर्षांपासून ओळखत आहे. एका स्पेशल पोलीस ऑपरेशनमध्ये नवीदची दविंदरसोबत ओळखत झाली होती. यानंतर दोघे मिळून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होऊ लागले. तीन वर्षांपूर्वी नवीद अहमद पोलीसची नोकरी सोडून दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामिल झाला होता.
7 वर्षांची मैत्री
दविंदरने चौकशीत एनआयएला सांगितले की, नवीद अहमदसोबत त्याची मैत्री सात वर्षे जुनी आहे. दविंदर सध्या राष्ट्रीय अन्वेषण विभागात म्हणजेच एनआयएच्या ताब्यात असून त्याची सतत चौकशी केली जात आहे. दविंदर प्रथम 2013 मध्ये नवीदला भेटला. नवीद पोलीस दलात कॉन्सटेबल म्हणून रूजू झाला होता, नंतर तो एसपीओमध्ये दाखल झाला, अशी माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.
दहशतवाद्यांना देत होता माहिती
चौकशीत दविंदरने सांगितले की एसपीओत असताना नवीद अनेकवेळा त्याच्या घरी येत असे. याशिवाय ऑफिसमध्येही दोघे सोबत असत. दोघेही एकमेकांना माहिती देत असत आणि नंतर ही माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहचवत असत. या कालावधीत दोघांनी भरपूर पैसे कमावले.
नवीदच्या घरच्यांशीही होते दविंदरचे संबंध
2017 मध्ये नवीद हिजबुलमध्ये गेला. त्याकाळात तो बडगामच्या चांदपोरामध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये तैनात होता. तेव्हा तो अचानक एक दिवस गार्ड रूममधून चार रायफल घेऊन फरार झाला आणि हिजबुलमध्ये सामिल झाला. यानंतर दविंदर सतत त्याच्या संपर्कात होता. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हे दोघे यानंतर अॅपद्वारे चर्चा करत असत. नवीद हिजबुलमध्ये गेल्यानंतर दविंदर त्याच्या कुटुंबाला सतत मदत करत होता. अनेकदा दविंदरने त्याच्या घरच्यांना गाडीने सुरक्षित ठिकाणीही पोहचवले होते.
खतरनाक दहशतवादी नवीद
नवीद अहमद हिजबुल मुजाहिदीनचा दुसरा मोठा कमांडर होता. नवीदनेच काही महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये 11 ट्रक ड्रायव्हरची हत्या केली होती. त्याच्यावर काही पोलीसांची हत्या केल्याचाही आरोप आहे. नवीदविरूद्ध एकुण 17 एफआयआर दाखल आहेत.