Daund Pune Crime News | पुणे: घरातून बाहेर काढल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून केला खून

पुणे: Daund Pune Crime News | वाद घालत असल्याने वडिलांनी मुलाला घराबाहेर काढले. त्याचा राग मनात धरुन मुलाने घराबाहेर झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून गंभीर जखमी केले. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मुलाला अटक केली आहे. (Murder In Daund)

सचिन सुनिल रणदिवे (रा. साठेनगर, दौंड) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. सुनिल लक्ष्मण रणदिवे (रा. साठेनगर, दौंड) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री सुनिल रणदिवे (वय ५५, रा. साठेनगर, दौंड) यांनी दौंड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती सुनिल, मुलगा सचिन, त्याची पत्नी सुवर्णा व दोन नाती असे एकत्र रहात आहे.

फिर्यादी या लोकांच्या घरी घरकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांची मोठी सुन सुवर्णा आणि सचिन यांच्यात प्रापंचिक वाद असल्याने ती ४ ऑक्टोबर रोजी माहेरी सोलापूरला निघून गेली होती. म्हणून तिला आणण्यासाठी सचिन ५ ऑक्टोंबरला सोलापूरला गेला. परंतु, तिने सचिनबरोबर येण्यास नकार दिल्याने ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी सचिन एकटाच घरी परत आला. फिर्यादी या दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर ते दोघे सचिनला समजावून सांगू लागले. परंतु, सचिन हा आपल्या आईवडिलांशी वाद घालू लागला. वाद वाढला तेव्हा सुनिल यांनी सचिन याला घराबाहेर काढले. तो घरातून निघून गेला.

त्यानंतर त्यांनी घराला कुलूप लावले. रात्री आठ वाजता ते घराबाहेर अंथरुण टाकून झोपले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा सचिन हा सिमेंटचा ब्लॉक घेऊन आला. त्याने आपले वडिल सुनिल यांच्या डोक्यात ब्लॉक मारला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर दौंडला प्राथमिक उपचार केल्यानंतर पुण्यात ससून रुग्णालयात आणण्यात आले. दौंड पोलिसांनी अगोदर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना सुनिल रणदिवे यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी त्यात खूनाचे कलम वाढविले आहे. पोलीस निरीक्षक संतोष डोके (PI Santosh Doke) तपास करीत आहेत.