बहुजननामा ऑनलाईन – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला NCB ने राजस्थानच्या कोटामधून बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थान पोलिसांच्या मदतीने NCB ने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरुद्ध NCB कडे 2 गुन्हे दाखल असून तो त्यात वॉन्टेड होता. चिकना हा डोंगरी परिसरात ड्रग्जची फॅक्टरी चालवत होता. डोंगरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर जवळपास 6 गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांत त्याचा समावेश आहे. तर एनसीबीच्या 2 गुन्ह्यात तो फरार होता.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच मुंबईत छापेमारीच्या कारवाई दरम्यान एनसीबीने दाऊदचा साथीदार चिंकू पठाणला अटक केली. पठाणच्या चौकशीदरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी चिकनाला अटक करण्यासाठी एनसीबीचे पथक ड्रग्जच्या फॅक्टरीत पोहोचले. त्यावेळी तो भिंतीवरुन उडी मारुन पळून गेला. त्यानंतर चिकनाचे लोकेशन राजस्थानमध्ये सतत सापडत होते.
जेव्हा एनसीबीच्या पथकाने दानिशला अजमेरमध्ये घेराव घातला. त्यावेळी देखील तेथूनही तो चकवा देऊन पळून गेला. पण नंतर कोटामध्ये त्याचे ठिकाण सापडल्यावर कोटा पोलिसांना कळविण्यात आले आणि दानिशला अटक केली. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाज खान यालाही अटक केली आहे. कोर्टाने एजाझला 3 एप्रिलपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे.